97632 06212 pwatsaru@yahoo.com

आधुनिकतेचे आगमन ः युरोपकेंद्री इतिहासाचा ‘जागतिक’ विचार


इसवी सनाच्या चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत जागतिक इतिहासात घडलेल्या अनेक घडामोडींच्या परिणामी जगाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन युरोपात विकसित झाला. जग हे मानवी प्रयत्नांनी बदलू शकते, हा विचार या नव्या दृष्टिकोनामध्ये केंद्रस्थानी होता. त्यासाठी प्रस्थापित विचारांना आणि समजांना प्रश्नांकित केले गेले. यापूर्वी निसर्ग आणि मानव, समाज आणि व्यक्ती, ईश्वर आणि मानव अशा द्वंद्वांमध्ये मानवाला दुय्यमत्व दिले जात असे. विवेकाच्या आधाराने या नव्या दृष्टिकोनाने मानवाला केंद्रस्थान दिले. या कालखंडात अनेक वैचारिक, भौतिक आणि सांस्कृतिक घडामोडी आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये घडून आल्या. त्यांपैकी प्रामुख्याने युरोपातील घडामोडींमुळे जी तत्त्वे, मूल्ये, सिद्धांत, संकल्पना आणि एकूणच जगाकडे पाहण्याची दृष्टी विकसित झाली, तिला साधारणपणे आधुनिकता म्हणून ओळखले जाते. अर्थातच बोली भाषेतील अद्ययावत अशा अर्थाच्या याच शब्दापेक्षा सामाजिक शास्त्रांमध्ये आधुनिकता या संकल्पनेला वर उल्लेखलेली ऐतिहासिक व वैचारिक पार्श्वभूमी अभिप्रेत असते.