97632 06212 pwatsaru@yahoo.com

‘फत्ते तोरणमाळ’


दिनानाथ मनोहर यांची ‘फत्ते तोरणमाळ’ ही नवीन कादंबरी शब्द पब्लिकेशनने नुकतीच प्रकाशित केली आहे. राजकीय घडामोडींच्या परिप्रेक्ष्यात विविध वैचारिक प्रवाहांचे कलात्मक आणि चिकित्सक चित्रण करणार्या साहित्यरचना मराठी वाङ्मयीन क्षेत्रात अभावानेच आढळतात. इंग्रजी वसाहतवादी राजवटीला शह देण्यासाठी आपल्या देशात झालेल्या स्वातंत्र्यचळवळींच्या पार्श्वभूमीवर ज्या कथा-कादंबर्या लिहिल्या गेल्या त्यामध्ये देखील राजकीय-वैचारिक बहुविधता आणि त्यांच्यातील परस्पर संघर्ष-समन्वय याबाबतचे वास्तविक रेखाटन क्वचितच दिसून येते. स्वातंत्र्योत्तर काळात 1960 नंतर धगधगणार्या राजकीय वातावरणात क्रियाशील असलेल्या साहित्यकर्मींनी आणि विशेषत: दलित साहित्याने जी मुसंडी मारली त्यामुळे मराठी साहित्य वेगळ्या वळणावरून धावू लागले. दिनानाथ मनोहर यांचा साहित्यिक प्रवास या वाटेवरून प्रगल्भ होत गेला आहे.