97632 06212 pwatsaru@yahoo.com

ग्राउंड रिपोर्ट from JNU...


नवी दिल्लीच्या महरौली-वसंतकुंज भागात वसलेलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू सध्या देशभरात चर्चेचा विषय बनलं आहे. अर्थात ते आधी चर्चेचा विषय नव्हतं अशातला भाग नाही. ह्या वर्षात पहिल्यांदा चर्चेत राहिलं ते केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने उच्चशिक्षणासाठी फेलोशिप बंद केल्याच्या विरोधात Occupy UGC ह्या आंदोलनाबद्दल; दुसर्यांदा चर्चेत आलं ते हैदराबाद सेंट्रल विद्यापीठाच्या रोहित वेमुला आत्महत्या (?) प्रकरणात केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयावर नेलेल्या मोर्चाबद्दल; तिसरा मुद्दा, दि. 9 फेब्रुवारीच्या संध्याकाळी जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या देशविरोधी घोषणाबाजीमुळे. 9 फेब्रुवारी ते आज 17 फेब्रुवारी ह्या गेल्या आठ दिवसांत उतावळ्या मीडिया ट्रायल्समधून भारतातील सर्वांत नामांकित विद्यापीठ म्हणून लौकिक असलेली जनमानसातील प्रतिमा जाऊन 'दहशतवाद्यांचा अड्डा' अशी झाली. देशात राहणार्या प्रत्येकाला मत मांडण्याचा, प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे त्यानुसार अनेकांनी राष्ट्रीय भावनिक लाटेवर स्वार होत मीडिया ट्रायल्सच्या 'ओ'ला 'हो' जोडत जेएनयू बंद करा म्हणून तगादा लावला. प्रथमदर्शनी या संपूर्ण प्रकाराबाबत एक संदिग्धता वाटत होती, मीडियात ज्या अविवेकी पद्धतीने जेएनयूबाबत वक्तव्ये होत होती (आजही-आताही होत आहेत) त्यामुळे त्या संदिग्धतेला बळकटी प्राप्त होत होती म्हणून शेवटी संपूर्ण प्रकरण समजावून घेण्यासाठी पुन्हा जेएनयू गाठलं, 9 तारखेच्या घटनेपासून परवाच्या पटियाला हाऊस कोर्ट मारहाण प्रकरणाच्या अनेक प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांशी चर्चा केली; त्याचा हा 'ग्राउंड झिरो रिपोर्ट!'