97632 06212 pwatsaru@yahoo.com

जीवनमूल्याचे भान देणारी कविता


कवी दिगंबर झाडे हे काव्यजगतात सुपरिचित असे नाव आहे. ‘वज्रनाद’नंतर त्यांचा दुसरा कवितासंग्रह ‘अनॅलिसिस.’ त्यामध्ये ते जगाचे बदलते जीवनमूल्य, त्यातून उद्भवलेली परिस्थिती यावर भाष्य करतात. वर्तमानाच्या वास्तवाची धग कवीला अस्वस्थ करते. कवीची जाणीव समष्टीकरण झाल्याने ते सामाजिक दुःखाने व्यथित होतात. ते समाजाच्या भूत-भविष्याचा वेध घेतात. चिंतनमुख होतात. त्यातूनच त्यांची कविता प्रसूत होते. उपेक्षित मानव समाजाचे जीवन आविष्कृत करणे हाच त्यांच्या कवितेचा अंगभूत गुण आहे. खर्या अर्थाने ही सामाजिक जाणिवेची कविता आहे. त्यांच्या कवितेत उद्वेग, विद्रोह आणि चिंता आहे. समाजात घडणार्या अनेक घटनांच्या कार्यकारण संबंधाचे ही कविता अनॅलिसिस करू पाहते. त्याबाबत बोलू पाहते. ती समाजमनाला हलवू पाहते. समज देऊ पाहते. कवितेमधील उपरोध स्वपरीक्षण करण्यास बाध्य करतो.