97632 06212 pwatsaru@yahoo.com

मर्मभेदक दृष्टीचा प्रत्यय देणारी संहिता


समाजहिताचा व्यापक विचार करून वैचारिक लेखन करण्यासाठी तुमच्याकडे तत्त्वज्ञानाची बैठक असावी लागते. यासाठी व्यक्तिवादाचा विचार दूर सारून समष्टीप्रधान दृष्टीस स्वीकारावे लागते. ठाम भूमिका, व्यापक विश्लेषण दृष्टी आणि हेतूंची स्पष्टता म्हणजेच आपण कुणासाठी आणि का लिहीत आहोत याबद्दलची काहीएक निश्चितता. सुभाष थोरातांचे 'वर्तमानाची बखर' (2015) हे पुस्तक या सर्व कसोट्यांवर उतरणारे आहे असे वाटते. चार विभागांत विखुरलेले हे पुस्तक विविध विषयांना स्पर्श करणारे आहे. यामध्ये साहित्य, संस्कृती, धर्म़, दलितांवरील अन्याय, राजकारण, महामानवांचे कार्य आणि त्याचे आजच्या वर्तमानाशी असलेले नाते, तत्त्वज्ञान, 'फँड्री' आणि 'देऊळ' यासारख्या चित्रपटांची चर्चा, जातसंस्थेची मूलगामी संभाषिते, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयांची चर्चा या पुस्तकात येते. इतक्या विविध विषयांचा परामर्श घेत असताना थोरात आपल्या ठाम वैचारिक आणि राजकीय भूमिकेपासून जरासुद्धा ढळत नाहीत ही विशेष गोष्ट पुस्तक वाचताना लक्षात राहते. त्यांची वैचरिक बैठक ही मार्क्सवादी विचाराची आहे, म्हणूनच हे घडताना दिसते.